अचारी पनीर

paneer
झटपट भाजी करायची आहे आणि कांही तरी वेगळेही हवे अशावेळी अचारी पनीर ट्राय करायला अजिबात हरकत नाही.
साहित्य – पनीरचे तुकडे १ वाटी, अर्धी वाटी लांब चिरलेला कांदा, पाऊण वाटी दही, फोडणीसाठी तेल, पाव चमचा बडीशेप, पाव चमचा मोहरी, थोड्याश्या मेथ्या, अर्धा चमचा हिंग, थोडे जिरे, कलौंजी पाव चमचा, चवीनुसार लाल तिखट, मीठ, हळद

कृती – प्रथम कढईत १ मोठा चमचा तेल घालून बडीशेप, मोहरी, कलौंजी, मेथी घालून फोडणी करावी आणि त्यात लांब पातळ चिरलेल्या कांद्याचे काप घालून पारदर्शक होईपर्यंत परतावे. नंतर त्यात पनीरचे तुकडे घालावेत. वरून हळद, लाल तिखट घालावे व चांगले परतून नंतर दही घालावे. १ लहान चमचा मैदा वरून लावावा व चवीनुसार मीठ घालून पुन्हा ढवळावे. तीन चार मिनिटे शिजू द्यावे व नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबिर घालून सजवावे. गरम भात अथवा पोळीबरोबर खायला द्यावे.