इंटरनेटच्या सहाय्यानेही करता येणार मतदान

brahma
दिल्ली -भविष्यात मतदार इंटरनेटच्या सहाय्यानेही मतदान करू शकतील असे मुख्य निवडणूक आयुक्त एच.एस ब्रह्मा यांनी सांगितले. हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती काळ जावा लागेल यासंदर्भात मात्र त्यांनी कांहीही माहिती दिलेली नाही.

ब्रह्मा म्हणाले की इंटरनेटच्या सहाय्याने मतदान ही अशक्य बाब नाही. ती प्रत्यक्षात येऊ शकते मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निर्दोष मतदार यादी प्रथम बनविणे आवश्यक आहे आणि ते काम निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. अर्थात या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पैसा, कांही संसाधने आणि प्रशिक्षणाची गरज आहेच. युवा मतदारांना ही सुविधा म्हणजे पैसा, वेळ आणि उर्जेची बचत वाटेल असेही ते म्हणाले.

या प्रकल्पाचा एक आवश्यक भाग म्हणून निवडणूक आयोग मतदार फोटो ओळखपत्रे यूआयडीएआय ( युनिक आयडेंटिफिकेशन नंबर)शी जोडली जात आहेत. देशात १० ते १२ टक्के मतदारांची नांवे एकाहून अधिक ठिकाणी आहेत. दक्षिणेकडील एका राज्यात तर अशा मतदारांची संख्या ४२ टक्के आहे. निवडणूक आयोगाच्या नवीन यादीनुसार देशात ८५ कोटी मतदार आहेत. ज्यांची नावे एकाहन अधिक ठिकाणी आहेत त्या मतदारांनाच त्या संदर्भात नांवे हटविण्यासाठी सांगितले गेले आहे. १५ दिवसांत ही कार्यवाही पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत ५० कोटी मतदारांची युआयडीएआय नंबरसह नोंदणी केली गेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या मतदारांची एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदणी केली आहे, त्यांना यापुढे इंडियन पीनल कोड खाली दंड अथवा शिक्षा होऊ शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment