फुलंब्रीत आढळलेले हिरे नाही… ते आहेत चमकणारे दगड

daimond
औरंगाबाद – फुलंब्री तालुक्यातील वडोदवाडी येथील शेतात सुरू असलेल्या विहिरीच्या खोदकामात हिरेसदृश चमकणारे दगड आढळल्याने हा चर्चेचा विषय बनला असून, लोक विहिरीकडे धाव घेतांना दिसून येत होते.

वडोदवाडी येथील गट क्र. ५३ मधील गाडेकर यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम चालू असताना, काम करणार्‍या मजुरांना अचानक पांढरे शुभ्र चमकणारे काही बारीक दगड सापडले. शिवाय ज्या ठिकाणी दगड सापडले तो भाग चुन्याप्रमाणे आहे आणि त्याच बाजूला विहिरीत दूरपर्यंत बोगदा असल्याचे दिसून आले. तेव्हापासून विहिरीत असलेले पाणी त्या बोगद्यात जात आहे. त्यामुळे मजुरांना सापडलेले दगड हे हिरेच असल्याचा संशय आला.

वडोदबाजार ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन त्यामधील दहा ते बारा हिरेसदृश दगड ताब्यात घेतले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून याबाबत चर्चा होत आहे; मात्र अद्याप त्याबाबतचे निदान झाले नाही. भूवैज्ञानिकांनी आणि भारतीय पुरातत्व विभागाने पाहणी करून या दगडाची तपासणी केल्यास काय ते निष्पन्न होऊ शकेल.