बहिरी ससाण्यांसाठी पंचतारांकित हॉस्पिटल

hawk
अबूधाबी – माणसांसाठी आज जेथे पुरेशी रूग्णालये नाहीत तेथे खास पक्ष्यांसाठी रूग्णालये कुठून असणार असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. आबुधाबीत खास बहिरी ससाण्यांसाठी पंचतारांकित रूग्णालय चालविले जात असून हे जगातील सर्वात मोठे पक्ष्यांसाठीचे रूग्णालय आहे. येथे आयसीयू सह एक्स रे, रेस्ट रूम, एसी रूम्स अशी सर्व सुविधा उपलब्ध आहे. दरवर्षी येथे सरासरी ९ हजार बहिरी ससाण्यांवर उपचार केले जातात.

हे रूग्णालय १९९९ मध्ये सुरू केले गेले असून आत्तापर्यंत येथे तब्बल ६७ हजार ससाण्यांवर उपचार केले गेले आहेत. त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी एक्सरे मशीन वापरली जातात. विशेष म्हणजे या स्थळाला भेट देण्यासाठी पर्यटक मुद्दाम येतात. अरब देशात बहिरी ससाणा हा शुभ पक्षी मानला जातो. त्यामुळे त्याला खायला प्यायला देणे हे शुभ काम मानले जाते. येथे या पक्ष्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी येणार्‍यांचीही मोठी गर्दी असते. बहिरी ससाणा या भागात मुद्दाम पाळलाही जातो कारण ते स्टेटस सिबॉल समजले जाते. त्यांचे लिलावही होतात आणि प्रचंड रकमा देऊन लोक त्यांची खरेदीही करतात.

या रूग्णालयात सौदी, कतार, कुवेत येथूनही बहिरी ससाणे उपचारासाठी आणले जातात. पाकिस्तान, कझाकीस्तान आणि इराणमधून आणल्या गेलेल्या १३ हजार ससाण्यांवर येथे आत्तापर्यंत उपचार केले गेले असल्याचेही समजते. येथे बहिरी ससाण्यांसाठी खास ब्रिडींग सेंटरही चालविले जाते.

Leave a Comment