परीक्षेच्या तोंडावर बोर्डाची हेल्पलाईन ‘बंद’

board
पुणे – पुन्हा एकदा पुणे विभागीय परीक्षा मंडळाचा अकार्यक्षमतेचा प्रकार समोर आला असून बारावीची परीक्षा सुरु असताना पुणे विभागीय मंडळाचा हेल्पलाईन क्रमांक चक्क बंद आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत असणाऱ्या शंका, अडचणी समजून घेण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधत असताना फोन बंद असल्याचा अनुभव येत आहे. तोच प्रकार समुपदेशनाच्या बाबतीत असून समुपदेशकांशी संपर्क होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत.

बारावीची परीक्षा आजपासुन सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे. यापैकी पुणे विभागीय मंडळाने परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला. तसेच विद्यार्थ्यांनी तणावविरहित वातावरणात परीक्षा द्यावी याकरीता समुपदेशकांची नियुक्ती केली. विद्यार्थ्यांना संपर्क साधण्यासाठी मंडळाने दिलेले संपर्क क्रमांक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. विद्यार्थ्यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असता फोन बंद असल्याचे समोर आले. या प्रकरणाकडे पुणे विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांचे लक्ष वेधले असता, हेल्पलाईन बंद असल्याची कल्पना त्यांना नव्हती, यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हेल्पलाईन क्रमांक बंद असेल तर तत्काळ सुरू करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Comment