सरकारी रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणे आवश्यक

swine-flu
पुणे – स्वाईन फ्लू बळींची संख्या देशभरात झपाटयाने वाढत असून देशभरात स्वाईन फ्लूने मागील तीन दिवसांत १०० जणांचा बळी गेला आहे तर पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात तिघांचा बळी गेल्यामुळे २००९ नंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची दहशत दिसत आहे.

स्वाईन फ्लूचे विषाणू पुन्हा एकदा वातावरणातील बदलामुळे सक्रीय झाले असून स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस उपलब्ध असली तरी ती सरकारी रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णालयात ती सर्व सामान्यांन न परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे.

स्वाईन फ्लूची लागण झाल्यास मोठी गुंतागुंत मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराच्या रुग्णांना निर्माण होत असल्यामुळे अशा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो. सन २००९ मध्ये स्वाईन फ्लू देशभरात पसरला होता. याचे सर्वाधिक बळी पुणे शहरात नोंदवले गेले होते. यानंतर मात्र स्वाईन फ्लूच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या घटत गेल्याचे चित्र होते. मात्र जानेवारी महिन्यापासून पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. देशभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत असून बळींची संख्याही मोठी आहे. यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बाजारात मागील वर्षी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली असली तरी ती खास खासगी रुग्णालयांमध्येच मिळते. एका लसीची किंमत ८००-१२०० रुपये आहे. यामुळे लस घेण्याकडे नागरिकांचा ओढा कमी आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे :
– सर्दी, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी आणि क्वचित प्रसंगी उलट्या-जुलाब ही स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत.
– नेहमीचा आढळणारा फ्लू व स्वाईन फ्लूची लक्षणे सारखीच आहेत.
– सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तीने स्वाईन फलूची लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. उपचारास विलंब जिवावर बेतू शकतो.

खबरदारीचे उपाय :
– सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होत नाहीत तोपर्यंत जनसंपर्क टाळावा
– शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल लावावा
– गरम पाण्यात मीठ व हळद टाकूण गुळण्या कराव्यात तसेच वाफ घ्यावी
– घरातील टेबल, टीपॉय, की बोर्ड वारंवार स्वच्छ करावेत
– फ्लू सदृश्य विद्यार्थी, शिक्षक आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा
– प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, वारंवार साबणाने हात धुवावा तसेच शारीरिक व मानसिक ताण टाळावा

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment