मागील अडीच महिन्यांत ५८५जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

swine-flu
नवी दिल्ली – स्वाइन फ्लूने हिमाचल प्रदेश, उत्तरांचलसारखा बर्फाच्छादित प्रदेश, राजस्थानसारखा वाळवंटी प्रदेश, मध्य प्रदेशमधील जंगली भाग तसेच महाराष्ट्र-गुजरातसारखा किनारपट्टी भाग अशा संपूर्ण देशालाच वेढा घातला आहे. या आजाराचा भीषण चेहरा समोर आला असून अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइनच्या आजाराने देशभरात ५८५ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यापैकी १०० जण अवघ्या तीन दिवसांत दगावल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आली.

सध्या ८४२३ जणांवर स्वाइन उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला स्वाइन फ्लूचा सर्वाधिक फटका बसला असून या राज्यांत आतापर्यंत अनुक्रमे १६५, १४४, ७६, ५८ जणांचा मृत्यू ओढवला आहे. १५ फेब्रुवारीच्या एका दिवसात राजस्थानात १५ तर मध्य प्रदेश व गुजरातमध्ये आठ पेशंटांना जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये स्वाइन पेशंटची सर्वाधिक संख्या असली तरी या आजाराविषयीची जागरूकता व उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे मृतांची संख्या मात्र कमी आहे. मात्र पंजाबमध्ये उलट परिस्थिती आहे. येथील ६८ पेशंटपैकी तब्बल २५ जणांना जीव गमवावा लागला.