मातृत्वानंतर पुन्हा अंतराळ यात्रेवर जाणार महिला अंतराळवीर

liu-yang
बीजिंग – पुन्हा एकदा अंतराळ यात्रेसाठी चीनची पहिली महिला अंतराळवीर असलेल्या लिऊ यांगची निवड झाली असून आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसातच ती पुढच्या अंतराळ यात्रेच्या प्रशिक्षणासाठी रूजू झाली आहे.

अंतराळ प्रवासात किरणोत्सर्गाला तोंड द्यावे लागत असल्याने चिनी अंतराळ संशोधन संस्था विवाहित आणि अपत्य असलेल्या महिलांना प्राधान्य देते. किरणोत्सर्गामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर प्रभाव होत असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत एकही गरोदर महिला अंतराळ प्रवासाला गेलेली नाही.

३७ वर्षीय लिऊ २०१२ मध्ये चीनच्या तियांगआँग या प्रायोगिक अंतराळ स्थानकावर जाणार्‍या तीन सदस्यांच्या चमूत होती. येत्या पाच वर्षात चीन तियांगआँग या कायमस्वरूपी अंतराळ स्थानकाची निर्मिती करणार आहे. त्यावेळी जाणार्‍या अंतराळवीरांमध्ये लिऊचा समावेश आहे. अमेरिका आणि रशियानंतर २००३ मध्ये चीन अंतराळात मानव पाठविणारा तिसरा देश ठरला आहे. आतापर्यंत जगभरातून ५९ महिलांनी अंतराळात प्रवास केला असून १९६३ मध्ये रशियाची अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा ही पहिली महिला अंतराळवीर आहे.

Leave a Comment