नोकरीच्या अर्जात बायोडेटा ऐवजी पाठविली रेसिपी

chilli
लंडन- नोकरी मिळविण्यासाठी आता हस्ताक्षरातील बायोडेटा पाठविणे ही इतिहासजमा गोष्ट झाली आहे. ईमेल च्या माध्यमातून बायोडेटा पाठविताना तो अधिक इंप्रेसिव्ह कसा करावा यासाठी प्रशिक्षण वर्गही चालविले जातात. हे एक खास शास्त्रच आहे. मात्र नोकरीसाठी बायोडेटा पाठविताना दुसरेच कांही अनवधानाने पाठविले गेले तर दोन्ही बाजूंकडून काय प्रतिक्रिया येतील याचा नुसता अंदाज केला तरी खूप करमणूक होऊ शकेल नाही का?

लंडनमधील एका युवतीच्या बाबतीत असा प्रकार घडला. तिने बायोडेटा पाठविला खरा पण प्रत्यक्षात बायोडेटा ऐवजी तिने नजरचुकीने चिली बीफची रेसिपीच कंपनीकडे पाठविली. कंपनीच्या एचआर विभागाकडे ही मेल गेली. मात्र तेथील एच आर मॅनेजरची विनोदबुद्धी खूपच शाबूत होती. त्याने शांतपणे संबंधित युवतीला मेल केली की तुमची चिली बीफ रेसिपी खूपच आवडली. वाचूनच तोंडाला पाणी सुटले. मात्र नोकरी मिळविण्यासाठी इतकेच पुरेसे नाही तेव्हा कृपा करून आपला बायोडेटाही पाठवाल का?

कंपनीकडून मेलला आलेले उत्तर पाहून आनंदित झालेल्या युवतीने मेल उघडली. मजकूर वाचून तिचीही खूपच करमणूक झाली. मात्र त्वरीत तिने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागून आपला बायोडेटा कंपनीला पाठविला. आता तिला नोकरी मिळाली की नाही हे मात्र समजू शकलेले नाही.

Leave a Comment