फेसबुक देणार इंटरनेट सेवा मोफत

facebook
मुंबई : सोशल नेटवर्किंग साईटच्या अग्रमानांकित फेसबुक साईटच्या उपभोगत्यांना खुशखबर आहे. देशातील मोबाईल इंटरनेटचा वापर वाढवण्यासाठी आणि ग्रामीण लोकांना नि:शुल्क इंटरनेट सुविधा देण्यासाठी फेसबुकने अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेन्सशी करार केला असून त्यानुसार विविध क्षेत्रातील ३३ वेबसाईट्सही फेसबुकवरुन अॅक्सेस करता येणार आहेत. ही सुविधा केवळ रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहकांसाठी आहे. ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ (internet.org) या अॅपच्या माध्यमातून ही सुविधा दिली जाणार आहे.

ग्राहकांना फेसबुकव्यतिरिक्त अन्य विविध क्षेत्रांशी निगडीत ३३ वेबसाईट्स ‘इंटरनेट डॉट ओरआरजी’ या अॅपच्या माध्यमातून नि:शुल्क अॅक्सेस करता येणार आहेत. मात्र हे अॅप अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईल फोनमध्येच वापरता येणार आहे.

या वेबसाईट्समध्ये बीबीसीसारख्या माध्यम क्षेत्रातील वेबसाईट्स, क्रिकइन्फोसारख्या खेळाशी संबंधित वेबसाईट्स अशा आरोग्य, प्रवास, नोकरी, स्थानिक शासन इत्यादींशी संबंधित या ३३ वेबसाईट्स असणार आहेत.

सध्या देशातील महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा या सहा राज्यातीलच रिलायन्सच्या ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे. शिवाय येत्या तीन महिन्यांमध्ये संपूर्ण देशभर ही सुविधा उपलब्ध करण्याचा मानस रिलायन्स कम्युनिकेशन्सने व्यक्त केला आहे. भारत हा आशिया खंडातील पहिला देश आहे, ज्या देशात फेसबुकने ही नवी योजना आणली आहे.

Leave a Comment