लग्नात पाऊस नको? मोजा १ लाख पौंड

rain
लग्न हा प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी येणारा क्षण असावा असे वाटते. लग्न म्हटले की पाहुणे रावळे, वधू वर, मस्त मस्त कपडे, दागदागिने, मेजवान्या यांची रेलचेल. पण अशा आनंदाच्या प्रसंगी पाऊस कोसळायला लागला तर वधूवरासह सारेच वर्हालडी हिरमुसतात. कारण पावसामुळे लग्नाचा आनंद पुरेपूर उपभोगता येत नाही. इंग्लंडसारख्या देशात जेथे सततच पावसाचा धोका असतो, तेथे तर पाऊस येऊ नये म्हणून वधूवर नवसही बोलतात असे सांगितले जाते.

मात्र देव झाला तरी तो नवसाला नेहमी पावतोच असे कुठे आहे? पण काळजी करायला नको. तुमच्या लग्नात पाऊस येणार नाही याची हमी अॅलीवर ट्रॅव्हल्स या कंपनीने दिली असून लग्नात पाऊस कोसळू नये म्हणून ही कंपनी बंदोबस्त करणार आहे. लहानशी अट इतकीच की त्यासाठी तुम्ही कंपनीला १ लाख पौंड मोजायचे आहेत. ते एकदा दिले की तुमच्या विवाहस्थळाच्या ३० किमीच्या परिसरात पाऊस थांबविण्याची जबाबदारी त्यांची. अगदी ढग भरून आले असले तरी पाऊस पडणार नाही याही हमी कंपनी देते.

पाऊस पडण्यासाठी जसे क्लाऊड सिडींग केले जाते तसेच पाऊस न पडण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. चीनमध्ये बिजिंग ऑलिपिक स्पर्धांदरम्यान याच पद्धतीने पाऊस थांबविला गेला होता. अॅलीव्हर कंपनी याच तंत्रज्ञानाचा वापर करते. क्लाऊड सिडींगची प्रक्रिया पूर्ण झाली की ढग कितीही दाटून आले तरी २४ तास पाऊस अथवा बर्फवृष्टी होत नाही असे सांगितले जाते. कंपनीने सध्या ही सेवा फक्त विमानतळाच्या आसपासच्या ३० किमी अंतरापर्यंतच सुरू केली असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment