आता केवळ दहा दिवसातच तयार होणार पासपोर्ट

passport
नवी दिल्ली : पासपोर्ट तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च तसेच हो-णाया अनेक त्रासांपासून लवकरच मुक्ती मिळणार असून आता केवळ दहा दिवसातच पासपोर्ट तयार होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी आपल्याला पासपोर्ट साठी पासपोर्ट कार्यालय किंवा पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही आणि खूप सारे दस्तावेजही जोडावे लागणार नाहीत.याबाबतची सर्व प्रक्रिया घरबसल्याच ऑनलाईन करता येणार आहे.पासपोर्टसाठी आता केवळ आवश्यक तेवढेच आणि कमीतकमी दस्तावेज लागणार आहेत. ओळखपत्र आणि निवासी दाखला यासारख्या कागदपत्रांसाठी केवळ आधार कार्डची प्रत जोडावी लागणार असून, ही सर्व कागदपत्रेदेखील ऑनलाईनच जोडता येणार आहे. पासपोर्टसाठी आवेदन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला अवघ्या तीन दिवसातच पासपोर्ट कार्यालयाकडून भेटीची वेळ कळविली जाईल. यानंतरच्या सात दिवसात पासपोर्ट त्याला घरपोच प्राप्त होणार आहे. पासपोर्टची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सीताराम यादव यांनी दिली.यापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज करणा-या व्यक्तीला त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही, याची सत्यापन प्रत जवळच्या पोलिस ठाण्यातून आणावी लागत होती. पोलिस ठाण्यातील कर्मचारी यात बराच विलंब करायचे, त्यामुळे पासपोर्ट मिळायला प्रचंड उशीर लागायचा, असेही त्यांनी सांगितले.