वॉशिंग्टन : सॅन फ्रँसिस्को हॉस्पिटल फाउंडेशनला ७५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ४६५ कोटी ३७ लाख रुपयांची देणगी जगातील आघाडीचे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेल्या फेसबुकचा तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनी दिली आहे.
झुकेरबर्गची ४६५ कोटींची देणगी
या फाऊंडेशनची स्थापना १९९४ मध्ये झाल्यापासून ही सर्वांत मोठी देणगी ठरली आहे. या देणगीच्या सन्मानार्थ या रुग्णालयाचे नाव बदलण्यात येणार आहे. ‘प्रिसिला अँड मार्क झुकेरबर्ग सॅन फ्रँसिस्को जनरल हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर’ असे त्याचे नामकरण करून झुकेरबर्ग दाम्पत्याचा गौरव करण्यात येणार आहे. नव्या रुग्णालयासाठी यंत्रे, साहित्य आणि नवे तंत्रज्ञान घेण्यासाठी या देणगीचा उपयोग करण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हे नवे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. जुन्या रुग्णालयाची इमारत भूकंपरोधक नसल्याने या ठिकाणी नवी इमारत बांधण्यात येणार आहे.