जपानमध्ये सुट्टी घेणे बंधनकारक होणार

japan
जगातील तीन नंबरची मोठी अर्थव्यवस्था गणल्या गेलेल्या जपानमध्ये नागरिकांना कामावर सुट्टी घेणे कायद्याने बंधनकारक करण्यात येणार असल्याची खबर आहे.जपानी सरकार चालू संसदीय अधिवेशनात या संदर्भातले विधेयक मांडणार असल्याचे समजते. गेली अनेक वर्षे याबाबत संशोधन केल्यानंतर जपानने हा निर्णय घेतला आहे.

एकीकडे अधिक सुट्टयांमुळे भारतासारखे देश अडचणीत येत असताना दुसरीकडे अजिबात सुट्टी न घेतल्यामुळे जपानसमोर अडचण उभी राहिली आहे. जपानी नागरिक सतत कामात बुडालेले आहेत. मात्र त्यांची ही सवय सरकार त्यांना बदलण्यास भाग पाडणार आहे. आपल्या कंपनीतील कामगारांना पुरेसा आराम मिळावा याची जबाबदारी कंपनी मालकांवर टाकली गेली आहे. अति कामामुळे आरोग्य, सामाजिकता आणि उत्पादकतेवरही ताण येत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. अनेक कर्मचारी आपले सहकारी नाराज होतील म्हणून सुटी घेण्याचे टाळतात.

जपान्यांच्या कामाच्या व्यसनामुळे त्यांची जीवनशैली बदलली आहे. यात मुलांचे पालनपोषण करण्यात वेळ जातो म्हणून मुले न होऊ देण्याकडचा कल वाढत चालला असल्याने जपानमध्ये जन्मदर सातत्याने घटतो आहे. याचा विपरित परिणाम होऊन जपानी अर्थव्यवस्था कमजोर होऊ लागली आहे असेही आढळले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी सुट्टी घेतलीच पाहिजे असा कायदा आता सरकारला करावा लागतो आहे.

Leave a Comment