पुण्यात आढळले ‘स्वाईन फ्लू’ चे नवे ३४ रुग्ण

swine-flu
पुणे : स्वाईन फ्लूचे तब्बल ३७ नवे रुग्ण १ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान शहरात सापडले असून यावरून पुणे स्वाईन फ्लूच्या विळख्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात स्वाईन फ्लूची तीव्रता झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा २००९ सारखी गंभीर स्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षभरात शहरात स्वाईन फ्लूचे जेवढे रुग्ण आढळले होते तेवढे या वर्षी अवघ्या ३४ दिवसांमध्ये आढळले आहेत.

२०१३ मध्ये स्वाईन फ्लूचे ३५ रुग्ण सापडले होते. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात स्वाईन फ्लूचे नवे ८ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मागील आठ महिन्यांपासून गायब असलेल्या स्वाईन फ्लूने शहरात थंडी पडताच डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. जानेवारी महिन्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

या महिन्यात स्वाईन फ्लूने ७ जणांचा बळीही घेतला. यात भर म्हणून गुरुवारी शहरात आणखी ८ नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-यांची संख्या १५ झाली असून, यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. या नव्या रुग्णांमुळे या वर्षातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. सर्दी-खोकला, घसादुखी होताच स्वाईन फ्लूची तपासणी करण्यासाठी नागरिक दवाखाने, रुग्णालयांमध्ये गर्दी करू लागले आहेत. तपासणीसाठीचे हे प्रमाण महिनाभरात दुप्पट झाले आहे.