चीनमध्ये स्प्रिंग फेस्टीव्हलची धामधूम

spring
चीनचा नववर्षाचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा स्प्रिंग फेस्टीव्हल चुनयुन म्हणजेच वसंतोत्सव दणक्यात सुरू झाला आहे. चीनमधील हा सर्वात मोठा उत्सव आणि त्यामुळे मोठ्या सुटीचाही उत्सव. या सणाच्या निमित्ताने ४० दिवसांची सुटी दिली जाते आणि विशेष म्हणजे लक्षावधी चीनी यावेळी प्रवासात असतात. यंदाही प्रवाशांची अशीच गर्दी दिसून येत असून रेल्वे, बस, विमानांची सर्व तिकीटे विकली गेली आहेत. इतकेच नव्हे तर जादा बस, विमाने, रेल्वेही सोडल्या गेल्या आहेत. यंदा २५ कोटी चीनी नागरिक प्रवासासाठी बाहेर पडले आहेत अशा बातम्या येत आहेत.

गर्दी लक्षात घेऊन बसेस, रेल्वेस्टेशन तसेच विमानतळांवर जादा सुरक्षा तैनात केली गेली आहे. एखाद्या सणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवासास निघणारे चीनी हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आपल्याकडच्या दिवाळीप्रमाणेच हा मोठा सण असून तो ४००० वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने साजरा केला जात आहे. सणासाठी लोक आपापल्या गांवी म्हणजे घरी परततात. सणाची खास पक्वान्ने, फटाके, आकाशकंदिल, घरांची सजावट, साफसफाई सध्या असे चीनमधील प्रत्येक गावात दिसणारे दृष्य आहे. अनेक नागरिकांनी ही सुट्टी परदेशात घालविण्यासाठीही प्रस्थान ठेवले आहे. हा सण चीनबरोबरच जगातील अनेक देशांतही साजरा केला जातो.

लायन डान्स, ड्रॅगन डान्स, विविध करमणुकीचे खेळ. नाटके यांना या काळात उत येतो. खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या असतात. यंदा ई खरेदीलाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. एकमेकांना भेटी देण्यासाठी खरेदी केली जाते. घरात देव आणि पूर्वज यांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. चांगले दिवस यावेत म्हणून हा सण साजरा केला जातो. लाल रंगाचे या सणावर फार मोठे वर्चस्व असते. लाल रंग हा शुभ रंग मानला जातो.

Leave a Comment