लवकरच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यावर बंदी

devendra-fadnvis
मुंबई: तंबाखू, गुटखा, पानमसाला, सिगारेट यांच्या सेवनाने होणारा कर्करोग हा एका व्यक्तीस होत नसून त्यामुळे सगळे कुटुंबच उद्ध्वस्थ होते. अशा पदार्थांच्या विक्रीवर लवकरच बंदी आणण्यात येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यावरही बंदी आणून त्या दृष्टीने कठोर पावले उचलली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री जागतिक कर्करोग दिनानिमित्त टाटा मेमोरियल रूग्णालय, परेल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कर्करोगाचे जे प्रमाण २० वर्षांपूर्वी होते तेच प्रमाण आजही आहे. त्यामुळे कर्करोगाबाबतची जनजागृती व्यापक प्रमाणावर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

शैक्षणिक संस्थेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर तंबाखू, पानमसाला यांची विक्री होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागात तर खूप मोठ्या प्रमाणावर तंबाखू व पानमसाला यांचे सेवन होत आहे. त्यामुळे गृह विभाग, शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने राज्यशासन लवकरच तंबाखू व पानमसाला विक्रीवर बंदी आणणार आहे. याकरिता शिक्षण विभागामार्फत प्रसिद्धीही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात तंबाखू उद्योगावर जे लोक अवलंबून आहेत अशा लोकांना सर्वप्रथम पर्यायी उद्योगाकडे वळविणे आवश्यक आहे. पंजाब शासनाने तंबाखूवर मोठ्या प्रमाणावर कर लावले आहेत. याचा तेथे काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते स्पष्ट झाल्यावर पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही तंबाखूवर मोठ्या प्रमाणावर कर लावण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.