या रेस्टॉरंटमध्ये माकडे करतात वेटरचे काम

makad
टोकियो – माणूस आणि माकडे यांच्या बुद्धीमत्तेत फारसा फरक नसतो आणि माणसाच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण माकडेही करतात हे आता प्रयोगातून सिद्ध झाले आहे. माकडांच्या या गुणाचा फायदा जपानमधील एका रेस्टॉरंट मालकाने अचूक उठविला असून त्याच्या टोकियोतील काबुकी नावाच्या रेस्टॉरंटमध्ये माणूस वेटर नाहीत. तेथे हे काम माकडेच करतात.

मालकाच्या या कल्पनेचा ग्राहक वाढीसाठी खूपच उपयोग झाला असून माणसे येथे अन्नपदार्थांच्या खासियतीऐवजी माकडांसाठीच रांगा लावत आहेत. आत आलेल्या ग्राहकाचे स्वागत करणे, त्यांना मेन्यू कार्ड देणे, खाद्यपदाथांची ऑर्डर घेणे आणि खाद्य व पेये ग्राहकांना सर्व्ह करणे अशी सर्व कामे ही माकडे करतात. वेटरप्रमाणेच तीही युनिफॉर्म घालतात.

रेस्टॉरंट मालक सांगतो, त्याची पाळीव माकडे जेव्हा त्याच्या प्रत्येक कृतीची नक्कल करताना त्याने पाहिली तेव्हाच रेस्टॉरंटमध्ये त्यांना वेटर म्हणून ठेवायची कल्पना त्याला सुचली. येट चेन, फुकू चेन ही दोन माकडे येथे २००८ सालापासून वेटर आहेत. ग्राहक रेस्टॉरंटमध्ये आला की त्यांचे काम सुरू होते.एकजण ग्राहकाचे स्वागत करतो, दुसरा त्याला बसायला खुर्ची देतो, हात पुसायला नॅपकीन देतो. मेन्यू कार्ड दिले की खाद्यपदार्थांची ऑर्डर एकजण घेतो, दुसरा ते सर्व्ह करतो.

जपानमध्ये प्राण्यांकडून दोन तासापेक्षा अधिक काळ काम करवून घेण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे या रेस्टॉरंट मालकाने माकडांचा ताफाच बाळगला आहे. ग्राहक सांगतात, हे वेटर अतिशय तप्तर आहेत. ऑर्डर दिलेले खाद्यपदार्थ तसेच पेये ते अचूक आणून देतात इतकेच नव्हे तर त्यांना टेबल नंबरही व्यवस्थित लक्षात राहतो. त्यामुळे वेटर माकडांच्या सेवेवर ग्राहक खूष आहेत.

Leave a Comment