शिव आरोग्य टेलिमेडिसीन सेवेचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

uddhav
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या दुर्गम भागांत खेडोपाडी राहणा-या जनतेला टेलि-मेडिसीनच्या माध्यमातून शहरात उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा देणा-या शिव आरोग्य सेवेचे उद्घाटन केले. या योजनेमुळे दुर्गम भागांतील रुग्णांना मुंबईतील तजज्ञ डॉक्टरांकडून थेट उपचार मिळणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिव आरोग्य सेवा ही योजना चंद्रपूर, मेळघाट, गडचिरोली, डहाणू आदी दुर्गम व आदिवासी भागांतील रुग्णांना मुंबईसारख्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने राज्याच्या ग्रामीण भागांत राबविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. या योजनेत ग्रामीण भागातील रुग्णांशी व त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांशी शहरातील तज्ज्ञ डॉक्टर टेलिफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जाणार असून मुंबईसारख्या ठिकाणी बसून दुर्गम भागांतील रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणेसुद्धा शक्य होणार आहे.

रंगशारदा येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळघाट येथे सुरू केलेल्या पहिल्या टेलिमेडिसीन उपक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी आदित्य ठाकरे, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत उपस्थित होते. आज उद्घाटन झालेल्या या उपक्रमात डॉ. दीपक नामजोशी, डॉ. भूपेंद्र अवस्थी, डॉ. स्वप्नेश सावंत, डॉ. संदीप राणे, डॉ.हरविंदरसिंग मारमा, डॉ. प्रकाश जिआनदानी हे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. त्यांनी मेळघाटच्या आरोग्य केंद्रावर आलेल्या रुग्णांची मुंबईतून तपासणी केली. शिव आरोग्य योजनेच्या माध्यमातून टेलिमेडिसीनद्वारे उपाचारांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, शहरी भागातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन ग्रामीण भागांत सहज उपलब्ध होईल, असे शिवसेनेने वचननाम्यात सांगितले होते. आता राज्यात आमची युतीची सत्ता आली असून सर्वच गोष्टी सरकारवर ढकलून चालणार नाही त्यासाठी आपण स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेना आपल्या वचनपूर्तीची सुरुवात शिव आरोग्य योजनेच्या माध्यमातून करीत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले असून राज्यातील जनतेच्या वतीने मी त्यांचा आभारी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment