नवी दिल्ली: ई-कॉमर्स ग्राहकांना सर्वाधिक आवडणारे फीचर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी’, पण आता ही सुविधा आपल्याला भारतीय रेल्वेत सुद्धा मिळणार असून आयआरसीटीसीमधून तिकीट बुक केल्यानंतर आपण ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चे ऑप्शन निवडू शकता. एकदा इंटरनेट तिकीट आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपण पैसे देऊ शकणार आहात.
आता रेल्वे तिकीटही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’
रेल्वे तिकीटात ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ची सुरूवात करतांना आयआरसीटीसी अशा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणार आहेत जे आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करू इच्छित नाहीत. सोबतच ज्यांच्याजवळ नेट बँकिंगची सुविधा नाही, ते सुद्धा तिकीट बुक करू शकतात.
योजनेबद्दल अधिक माहिती देताना आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘फक्त ऑनलाइन तिकीट बुक करावे लागणार आणि तिकीट दिलेल्या पत्त्त्यावर पोहोचवले जाईल.’ या योजनेला पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर सुरू केले आहे आणि सुरूवातीला ही सेवा फक्त २०० शहरांमध्ये उपलब्ध असेल. याअंतर्गत ग्राहक प्रवासाच्या ५ दिवसांपूर्वी तिकीट विकत घेऊ शकेल.
स्लीपर क्लासच्या प्रत्येक तिकीटासाठी ४० रुपये डिलिव्हरी चार्ज घेतला जाईल तर एसी क्लासच्या प्रत्येक तिकीटासाठी ६० रुपये घेतले जातील. ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सेवेसाठी अंदुरिल टेक्नॉलॉजीजला त्यांची वेबसाइट किंवा त्याचे अॅप ‘बुक माय ट्रेन डॉट कॉम’च्या माध्यमातून अधिकृत केले गेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी तिकीट काऊंटरपासून दूर राहण्यासाठी आणि बुकिंग खिडकीच्या गर्दीपासून दूर राहण्यासाठी हा प्रयत्न आहे.