हरलेल्या उमेदवारावर सत्कार, भेटींचा वर्षाव

sarpanch
भारतात नेहमीच निवडणुकांचे वातावरण कुठे ना कुठे असतेच. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका मोठ्या प्रमाणावर होत असल्या तरी ग्रामीण भागात ग्रामपंचायती, पंचायत समित्या, साखर कारखाने अशा कुठल्या ना कुठल्या निवडणुका होत असतात. निवडणुक म्हटले की हारजीत आलीच. विजयी उमेदवाराचे सत्कार होणे यात विशेष कांही नसले तरी पराजित उमेदवारावरही सत्कारांचा वर्षाव होऊ शकतो. अशी घटना राजस्थानात घडली आहे.

राजस्थानात ग्रामपंचायतींच्या निवडणुका २४ जानेवारीला पार पडल्या. सिकर जिल्ह्यातील सहनुसर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दयानंद कटारिया सरपंचाच्या जागेसाठी प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले मात्र त्यांना मनोज जांगिड यांच्याकडून २७७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे कटारियांचे समर्थक फारच नाराज झाले आणि यात आपल्याकडूनच कांही कसर राहिली अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. मग या ग्रामवासियांनी कटारियांचे जागोजाग सत्कार करायला सुरवात केली आणि त्यांच्यावर भेटींचा वर्षाव केला. गेल्या तीन दिवसांत कटारियांना या सत्कारांतून १७ लाख रूपये रोख, एक मोठी कार आणि ७० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन मिळाली आहे. ग्रामवासियांनी वर्गणी काढून या भेटी दिल्या आहेत आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता विजयी जांगिड यांनाही आपण निवडणूक हरलो असतो तर बरे झाले असते असे तर वाटत नाहीये ना?

Leave a Comment