काश्मीर गुज्जर जमातीतील विवाह पद्धतीत होतोय बदल

gujjar-weding
श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील सर्वसाधारण नागरिकांत आजही धुमधडाक्याने आणि खर्चिक विवाहाची पद्धत असली तरी या राज्यातील जाती जमातींच्या लग्नपद्धतीत मात्र निश्चितपणे बदल होत असल्याचे ट्रायबल रिसर्च अॅन्ड कल्चरल फौंडेशनच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या राज्यातील गुज्जर आणि बकरवाल या जमातीत हे बदल विशेषत्वाने होत असल्याचे दिसले आहे.

या जमातीत वधूचे अपहरण करून विवाह करण्याची प्रथा होती तसेच बहुपत्नीत्वही त्यांची प्रथा आहे. गुज्जर समाजात आजही मुलगा किंवा मुलगी दोघांनाही आयुष्यात कधी ना कधी लग्न करावे लागतेच. म्हणजे ब्रह्मचारी किंवा कुमारिका म्हणून त्यांना जगता येत नाही. लग्नासाठी वधू पळवून आणताना विवाहित महिलांनाही पळवून नेता येते मात्र त्यासाठी त्यांची संमती आवश्यक असते. या दोन्ही प्रथा आता बंद होऊ लागल्या आहेत. तसेच लग्नासाठी होत असलेल्या खर्चातही कपात होताना दिसून येत आहे.

या जमातीत साधारण ५० हजार रूपयांत विवाह होतो. तीन जेवणे, नातेवाईक मित्रांचे आगतस्वागत, सर्व धार्मिक आणि समाजाच्या रिती सह हा खर्च केला जातो. तरीही कांही जण १ लाख रूपये खर्च करून लग्न करतात आणि त्याला बडे बिया म्हणजे ग्रँड मॅरेज असे म्हटले जाते अशी माहिती सर्वेक्षण केलेल्या संस्थेचे प्रमुख जावेद राही यांनी दिली.

जावेद म्हणाले की आधुनिकतेचा या जमातींवर काय परिणाम झाला हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले. कढूविवाह म्हणजे वधूचे अपहरण करून केला जाणारा विवाह. ही प्रथा पूर्णपणे बंद झालेली नाही कारण वधू पळवून नेणे हे वीरतेचे प्रतीक मानले जाते तसेच वधूच्या संमतीने हे अपहरण करायचे असल्याने आपल्या पसंतीच्या वधूशी विवाह करता येतो. बहुपत्नीत्वाची पद्धत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर असून ६२ टक्के लोकांनी किमान २ लग्ने केलेली आहेत. बाकीच्यांनी त्यापेक्षाही अधिक लग्ने केली आहेत असेही दिसून येते.

Leave a Comment