फेसबुकवर ‘गा-हाणे’ मांडणे गुन्हा नाही – सर्वोच्च न्यायालय

facebook
नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग सन्केतस्थळ फेसबुकला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून आपल्या तक्रारींसाठी फेसबुकसारख्या सोशल साईटवर काही टिप्पणी करणे हा गुन्हा ठरत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

फेसबुकवर आपली गा-हाणी मांडणे गुन्हा ठरत नसल्याचे स्पष्ट करतानाच बंगळूरच्या एका दाम्पत्याला न्यायामूर्ती गोपाल गौडा आणि न्यायामूर्ती आर. बानुमती यांच्या खंडपीठाने दिलासा दिला. या दाम्पत्याने एका पोलिसांकडून मिळालेल्या वाईट व अपमानास्पद वागणुकीबद्दल फेसबुकवर बंगळूर वाहतूक पोलिसांच्या पेजवर तक्रार केली होती. पोलिसांनी याच आधारावर या दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदविला होता. त्या प्रकरणाची सुनावणी होऊन या दाम्पत्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला.

वाहतूक पोलिसांचे फेसबुक पेज हे जनतेसाठीच तयार केले होते. आणि या दाम्पत्याने जी तक्रार केली ती मर्यादेमध्येच आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाचा यासंदर्भातील निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला. उच्च न्यायालयाने या दाम्पत्याविरोधातील दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली होती. या प्रकरणात माणिक तनेज आणि त्यांची पत्नी साक्षी जावा यांच्याकडून रस्त्यावर १३ जून २०१३ रोजी एक अपघात झाला होता. यामध्ये ऑटोरिक्षातील एक व्यक्ती जखमी झाला होता. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले होते आणि हे प्रकरण मिटविण्यात आले होते. मात्र अपघातस्थळावरील एका पोलिस कर्मचा-याने या दाम्पत्याला आपल्या वरिष्ठ अधिका-याला भेटण्यास सांगितले होते. त्यानंतर हे दाम्पत्य जेव्हा त्या वरिष्ठ अधिका-याला भेटण्यास गेले तेव्हा त्या अधिका-याने उद्धट वर्तन केले आणि धमकीही दिली. त्यामुळे या दाम्पत्यांनी वाहतूक शाखेच्या फेसबुक पेजवर आपबिती लिहिली होती. तसेच मेलद्वारे तक्रारही केली होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा या दाम्पत्यावर गुन्हा नोंदविला होता. त्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आणि या दाम्पत्यास दिलासा मिळाला.

Leave a Comment