मोदींप्रमाणेच केजरीवालांचेही हमशक्ल

kejri-dupli
दिल्ली – लोकसभा निवडणुकांदरम्यान मोदींचा भास होणारे त्यांचे हमशक्ल निवडणूक प्रचारात ठळकपणे सामोरे आले होते तोच धडा आता आम आदमी पक्षाच्या केजरीवालांबरोबरही गिरविला जात असल्याचे दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल यांचा जुळा भाऊ शोभावा असे अमरनाथ शर्मा तसेच अमृतसरमधील अनिल महाजन या दोन व्यक्ती आम आदमी पक्षासाठी प्रचारकामात उतरल्या आहेत.

अमरनाथ सांगतात अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी त्यांनी प्रथम केजरीवालांना पाहिले तेव्हाच त्यांच्या लक्षात केवळ चेहर्‍यातीलच नव्हे तर अंगयष्टी, उंची यातील साम्य लक्षात आले होते. केजरीवाल गळ्यात आणि डोक्यावरून ज्या पद्धतीने मफलर बांधतात तसाच अमरनाथही बांधतात मात्र अमरनाथ सांगतात की ते गावाकडे होते तेव्हापासून ते याच पद्धतीने मफलर बांधतात. अमरनाथ केजरीवाल यांच्याबरोबर निवडणूक अर्ज भरतानाही उपस्थित होते. केजरीवाल यांनाही आपला हमशक्ल आहे याची कल्पना आहे. अमरनाथ सांगतात अनेकवेळा लोक माझ्या पाया पडतात, हार घालतात, गाडीतून नेतात शेवटी मला सांगावे लागते की मी केजरीवाल नाही. सुदैवाने अमरनाथ यांच्यावर अजून तरी अंडी, सडके टोमॅटो अथवा थप्पड खाण्याची वेळ आलेली नाही.

अमृतसरमधील छोटे व्यापारी अनिल महाजन यांनाही आजकाल ते केजरीवाल यांच्यासारखे दिसतात म्हणून खूप प्रसिद्धी मिळते आहे. ते सांगतात घरचेही मला केजरीवाल म्हणतात. आमच्या दोघांचेही विचार सारखे आहेत आणि मी आम आदमी पक्षासाठीच काम करतो आहे. जेव्हा केजरीवाल यांच्याशी असलेले साम्य लक्षात आले तेव्हापासून अनिलही केजरीवाल यांच्याप्रमाणेच शर्ट आणि चष्मा वापरू लागले आहेत.