केवळ हिंदूजा बंधू जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत

hinduja
डाव्होस – यावर्षी हिंदूजा उद्योग समूहाचे श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा या दोन अनिवासी भारतीयांचाजगातील अव्वल ८० अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या जागतिक क्रमवारीत, १४ अब्ज डॉलर्ससह हिंदूजा बंधू ६६ व्या क्रमांकावर आहेत. नुकतीच जागतिक आर्थिक फोरममध्ये ऑक्सफॅम नावाच्या संस्थेने तयार केलेली ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

फोर्ब्जने गेल्या वर्षी तयार केलेल्या यादीतील संपत्तीची आकडेवारी आणि गुंतवणूक क्षेत्रातील बँकांकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ यादीसाठी घेण्यात आला आहे. या यादीत फक्त हिंदूजा बंधूंचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश होण्याचाच अर्थ ते इंग्लंडमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. ऑटोमोबाईल्स आणि बँकिंगसह माहिती तंत्रज्ञानासारख्या बहुतांश क्षेत्रात हिंदूजा उद्योग समूह आघाडीवर आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे ७६ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. यादीत समाविष्ट एकूण ८० अब्जाधीशांकडे मिळून एक खर्व ९० अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती असून त्यात २०१० च्या यादीच्या तुलनेत सहाशे अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. जगातील एक टक्के नागरिकांकडे एकूण जागतिक संपत्तीच्या ४८ टक्के संपत्ती असून उरलेल्या ५२ टक्के संपत्ती उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे असल्याचे यादीसोबत जाहीर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.