एअर इंडियाचा महाराजा मॉडर्न झाला

maharaja
कित्येक महिन्यांच्या सततच्या नुकसानीनंतर प्रथमच नफा कमावलेल्या एअर इंडियाने त्यांचे चिन्ह महाराजा याचा मेकओव्हर केला आहे. आजपर्यंत पगडी घालून हात जोडलेला महाराजा ही एअर इंडियाची ओळख होती. मात्र आता यापुढे हा महाराजा तरूण अवतारात दिसेलच पण त्याचा लूकही मॉडर्न असेल. नवा महाराजा चक्क केसांचे स्पाईक, जिन्स, स्नीकर्स आणि अगदी सडसडीत बांध्याचा आहे मात्र त्याच्या भरघोस मिशांना हात लावला गेलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार २१ जून २०१४ रोजी पंतप्रधान मोदी यांनी अॅव्हीएशन विभागाच्या पहिल्या बैठकीतच एअर इंडियाचा दूत आम आदमीच्या रूपात हवा. विमानसेवा केवळ श्रीमंतांची मक्तेदारी नाही तर सर्वसामान्यांसाठीही ही सेवा आहे असा संदेश दिला जावा अशी इच्छा व्यक्त केली होती आणि तशी योजना आखण्याचे आदेश दिले होते. भरघोस मिशांचा आणि पगडी घातलेला महाराजा ही एअर इंडियाची दीर्घकाळची ओळख. ती एकदम पुसून टाकणे शक्य नसल्याने महाराजाचा मेकओव्हर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आधुनिक काळात नवीन एअर इंडियाचे प्रतीक म्हणून या महाराजाला स्पोर्टी, डायनॅमिक लूक देण्यात आला. त्याच्या जाहिरातीही जोरात सुरू आहेत. एअर इंडियाच्या कांही विमानातून त्याच्या वेगवेगळ्या २७ रूपातील प्रतिमा झळकू लागल्या असून त्यातील एक क्रिकेटपटूचीही आहे. १९४६ साली जेआरडी टाटा यांच्या कमर्शियल डायरेक्टर बॉबी कूका आणि जे वॉल्टर थॉमसन यांचा आर्टिस्ट उमेश राव यांनी महाराजाचे डिझाईन केले होते.