भारतीय बनावटीचे ‘तेजस’ भारतीय वायू दलात

tejas
बंगळूर : भारतीय संरक्षण तथा वैमानिक क्षेत्रात स्वदेशी बनावटीचे हलक्या वजनाचे लढाऊ विमान भारतीय वायूदलात दाखल झाले असून हे विमान भारतीय वायूदलाकडे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सुपूर्द केले. या यशस्वी कार्याबद्दल वैज्ञानिकांचे कौतुक करण्यात येत आहे.

भारतात हलक्या वजनाच्या लढाऊ विमान बनविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ३२ वर्षांपूर्वी सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामकाजाचा पहिला मैलाचा दगड तेजसच्या रूपाने ठरला असून, तो भारतीय हवाई दलाकडे सोपविला गेला. देशातच तयार करण्यात आलेल्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाची ही योजना असून, या योजनेसाठी ८ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. संरक्षण संशोधन तथा विकास संघटना (डीआरडीओ), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.च्या योजनेसाठी तब्बल ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तेजस वेगवेगळ्या परिस्थितीत उड्डाण घेऊ शकते, अशी या विमानाची रचना आहे. या विमानात नाविन्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक युद्ध विशेषता बसविण्यात आली आहे. याबरोबरच हवेतच इंधन भरण्याची सुविधा, दूर अंतरावरून क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता यासह अन्य सुविधा आहेत. त्यामुळे हवाई दलाची क्षमता वाढली आहे. विशेष म्हणजे देशी बनावटीचे हलके विमान हवाईदलात सामिल झाल्याने भारताचा सन्मान वाढला आहे.

Leave a Comment