केप कॅनाव्हेराल : २०१४ हे गतवर्ष पृथ्वीच्या इतिहासामधील जैविक इंधनाच्या वाढत्या ज्वलनाने हरितगृह वायुंच्या उत्सर्जनामध्ये होणा-या वाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वांत उष्ण वर्ष ठरल्याचे अमेरिकेतील संशोधकांनी सांगितले. ही बाब अमेरिकेची अंतराळ संस्था नासा व राष्ट्रीय महासागर व वातावरण प्रशासन प्राधिकरण, या संस्थांनी केलेल्या अभ्यासामधून स्पष्ट झाली असून हवामान बदलाची प्रक्रिया प्रत्यक्षात घडत असून हरितगृह वायू वाढत्या उत्सर्जनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत या अभ्यास अहवालामधून व्यक्त करण्यात आले आहे.
नासाने केलेल्या अभ्यासातून २०१४ ठरले ‘उष्ण वर्ष’
१९ व्या शतकापासून पृथ्वीच्या तापमानाचा वर्षांनुसार अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासानुसार पृथ्वीवरील सर्वांत जास्त तापमानाची १० वर्षे ही १९९७ पासूनचीच आहेत. याआधी, २०१० हे सर्वांत उष्ण वर्ष असल्याचे आढळले होते. मात्र २०१४ मधील तापमान हे २०१० पेक्षाही जास्त आहे. या नव्या संशोधनामुळे गेल्या काही वर्षांत हवामान बदलाची प्रक्रिया थांबल्याच्या दाव्यासही उत्तर दिले गेले असल्याचे मानले जाते आहे. हवामान बदलाच्या प्रक्रियेसाठी हरितगृह वायुंचे उत्सर्जनच मुख्यत: जबाबदार असल्याचे नासाचे संशोधक गॅविन श्मिद यांनी सांगितले. पृथ्वीवरील हवामानामध्ये वाढत्या अनियमितपणामुळे अन्न व पाण्याच्या साखळीवरही नकारात्मक परिणाम होत आहे. समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होते आहे आणि यामुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यास धोका निर्माण झाला आहे, असे या अभ्यासामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.