ऑस्ट्रेलियात स्थापन होणार मानवी शरीर संग्रहालय

museum
ऑस्ट्रेलियात पहिले मानवी शरीर संग्रहालय सिडनी जवळ एका गुप्त ठिकाणी स्थापन केले जाणार असल्याची बातमी आहे. मानवाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे विघटन कसे होत जाते, कोणत्या अवयवांचे विघटन होण्यास किती वेळ लागतो, त्यात काय काय बदल होतात याचे अध्ययन करण्यासाठी हे संग्रहालय स्थापन केले जाणार असून त्याचा मुख्य उपयोग फोरेन्सिक तज्ञांना आणि पोलिसांना होणार आहे.

अमेरिकेत असे संग्रहालय दशकापूर्वीच स्थापन झाले आहे. ऑस्ट्रेलियातील तज्ञ याच संग्रहालयाकडून त्यांना हवा असलेला डेटा आत्तापर्यंत घेत आहेत. मात्र मानवाच्या मृत शरीरावर होणार्‍या परिणामात वातावरणाचा प्रभाव फार महत्त्वाचा असतो. यामुळे ऑस्ट्रेलियातील वातावरणातच हा अभ्यास करण्यासाठी असे संग्रहालय उभारले जात असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी देहदानाचे आवाहनही करण्यात आले आहे. माणसाच्या मरणाची नक्की वेळ ठरविणे, मरणाचे कारण शोधणे, आत्महत्त्येमागच्या कारणांचा शोध घेणे अशा अनेक बाबींची मदत या संग्रहालयामुळे तज्ञ डॉक्टर्स आणि पोलिसांना होऊ शकणार आहे.

Leave a Comment