उद्योगपती अविनाश भोसलेंना ‘ईडी’चा दणका

avinash
पुणे – अंमलबजावणी संचालनालयाने (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) फेमातंर्गत पुण्यातील वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना १ कोटी ८३ लाख रूपयांचा दंड केला आहे. अविनाश भोसले यांनी २००७ साली परदेश दौ-यातून येताना परकीय चलन व महागड्या वस्तू अवैधरित्या बाळगले होते व त्याची माहिती दिली नव्हती. भोसले यांच्यावर कोट्यावधी रूपयांची कस्टम ड्युटी चुकवल्याचा आरोप होता. अखेर या प्रकरणी भोसलेंना १ कोटी ८३ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

अविनाश भोसले यांच्याकडे अमेरिका व दुबईवरून भारतात परतत असताना मोठ्या प्रमाणात विदेशी चलन आढळून आले होते. तसेच परदेशातून आयात केलेल्या वस्तूंची माहिती उघड न केल्याने कस्टमच्या अधिकाऱ्यांनी भोसले यांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता. आपण दुबईत अली अझगरकडून १० हजार अमेरिकन डॉलर घेतले होते, अशी माहिती अविनाश भोसले यांनी रेव्हेन्यु इंटेलिजन्स डायरेक्टोरेटला दिली होती. पण एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला त्यांनी दिलेली माहिती त्यापेक्षा विसंगत आढळून आली होती.

अविनाश भोसले यांनी १९९७ पासून आजपर्यंतची सर्व देशी विदेशी बँकांची स्टेटमेंट व केलेले व्यवहार यांची माहिती संचालनालयाकडे सादर करावी असे फर्मान काढले होते. मात्र, भोसलेंनी बॅंकेच्या व्यवहाराबाबत माहिती सादर केली नाही. त्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले. दुबईच्या एबीएन-अॅम्रो आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत भोसले यांची खाती असल्याचे संचालनालयाला आढळले. भोसले यांची एबीएन-अॅम्रो बँकेत परकीय चलनासाठी चार उपखाती आहेत. या खात्यांमधून मोठ्या रकमेच्या उलाढाली झाल्याचे संचालनालयाला आढळले. भोसले यांच्या ट्रेडिंग कंपनी खात्यांतर्गत एकाच वर्षात ८ लाख अमेरिकन डॉलरची उलाढाल झाल्याचे ईडीने पुढे आणले होते. २००७ पासून हे प्रकरण कोर्टात होते. अखेर ईडीने अविनाश भोसले यांचे प्रकरण निकालात काढत त्यांना फेमातंर्गत १ कोटी ८३ लाख रूपयांचा दंड केला आहे.