इस्रोने विकसित केले रेल्वे डबे, इमारतींचे रक्षण करणारे अग्निरोधक

isro
तिरुवनंतपुरम् – मंगळ मोहीम यशस्वीरित्या पडल्यानंतर आता मंगळावर मानवाला पाठविण्याच्या दिशेने पावले उचलणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोने आता अतिशय कमी खर्चात अग्निरोधक आवरण विकसित केले असून, रेल्वेचे डबे आणि इमारतींचेही आगीपासून संरक्षण करण्यासाठी या आवरणाचा वापर होऊ शकणार आहे.

या अद्ययावत तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी इस्रो आता योग्य अशा औद्योगिक भागीदाराचा शोध घेत आहे. प्रत्यक्षात पीएसएलव्ही इंधन टँकचे रक्षण करण्यासाठी इस्रोने हे अग्निरोधक आवरण विकसित केले आहे. रेल्वेचे डबेच नव्हे, तर इमारतींचेही रक्षण करण्यासाठी या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असे इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘कॅस्पोल’ असे नाव असलेले हे उपकरण पाण्यावर आधारित ‘रेडी टू कोट’ आणि ‘इझी टू युज’ असे असून, आग कितीही मोठी असली, तरी सहजपणे ती आटोक्यात आणण्याची क्षमता त्यात आहे. भिंत, कपडे, पेपर, घराचे छत आणि लाकूड यावरही त्याचा प्रभावी परिणाम होऊ शकतो. या उपकरणात कोणतेही विषारी घटक समाविष्ट करण्यात आले नसून, ते पर्यावरणाला पोषक असेच आहे. या एक लिटर ‘कॅस्पोल’च्या सहाय्याने दीड चौरस मीटर इतके आवरण तयार करता येते, असे यात नमूद आहे.

Leave a Comment