बागपत : विटभट्टीवरील कामगारांनी उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील चांदयान गावात केलेल्या उत्खननात काही मानवी सांगाडे बाहेर आले असून राजधानी दिल्लीपासून अवघ्या १०० किमी अंतरावरच हे ठिकाण आहे. हे सांगाडे पाहता या गावाचा संबंध प्राचीन हडप्पा संस्कृतीशी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
बागपतमध्ये सापडले हडप्पाचे अवशेष !
ख्रिस्तपूर्व ३३०० ते २६०० असा हडप्पा संस्कृतीचा सुरुवातीचा टप्पा होता. त्यानंतर या संस्कृतीचा परिपक्व टप्पा सुरू झाला. तो ख्रिस्तपूर्व २६०० ते १९०० असा होता आणि त्यानंतरचा सुधारित काळ ख्रिस्तपूर्व १९०० ते १६०० असा होता. याच शेवटच्या टप्प्यातील हे पहिलेवहिले अवशेष बाहेर आले आहेत. विटा तयार करण्याकरिता भट्टीतील कामगार माती उपसत असताना त्यांना हे अवशेष आढळले, अशी माहिती भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक ए. के. पांडे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. उत्तरप्रदेशात हडप्पा संस्कृतीच्या शेवटच्या टप्प्यातील अवशेष आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सिनौली येथे प्राचीन स्मशानभूमी सापडली होती, असे त्यांनी सांगितले. या उत्खननात अनेक सांगाडे बाहेर आले. त्यांच्या डोक्यावर तांब्याचे मुकुट होते. या सर्वच मुकुटांवर तांब्याचा पातळ थर होता. तसेच केवळ हडप्पा संस्कृतीच्या काळात जे कार्नेलियन बीड (मौल्यवान हि-यांचा प्रकार) वापरण्यात येत होते, त्याचे अंशही या मुकुटांवर दिसून आले आहेत. पानाच्या स्वरूपात या हि-यांची रचना आहे. हा मानवी सांगाडा पाहून असे लक्षात येते की, हडप्पातील गावप्रमुखाचा तो मृतदेह असावा. या उत्खननात आम्हाला टेराकोटाची (विशिष्ट प्रकारची माती) भांडीही आढळून आली आहेत. या भांड्यांचा दर्जा फार विशेष असा नाही. या पाश्र्वभूमीवर भारतीय पुरातत्त्व विभागाने या भागात व्यापक प्रमाणात उत्खनन कार्य सुरू केले आहे, असेही पांडे यांनी सांगितले.