कंपन्यांची बक्षीसांची खैरात- कुणाची मर्सिडीज तर कुणाचा आयफोन

mercedez
इन्फोसिसने आपल्या तज्ञ आणि चांगले काम बजावलेल्या निवडक कर्मचार्‍यांना आयफोन सिक्स भेटीदाखल दिल्याची चर्चा सुरू असतानाच अन्य कंपन्यांनीही अशा महागड्या भेटींचा धडाका सुरू केला आहे. नजीकच्या भविष्यात बाजारात उपलब्ध होणार असलेल्या संधी आणि त्या साधण्यासाठी कंपन्यात सुरू असलेली चढाओढ हा सध्या उद्योगविश्वातील चर्चेचा विषय झाला आहे. परिणामी आपल्या कंपन्यांतील चांगल्या अधिकार्‍यांनी अन्य कंपन्यांचा विचारही करू नये यासाठी त्यांना पगारवाढ, बोनस बरोबरच महागड्या गिफ्ट देण्याचे जणू पेवच फुटलेले दिसून येत आहे.

एचसीएल ने त्यांच्या निवडक १३० कर्मचार्‍यांना मर्सिडीज गाड्या भेटी दाखल दिल्या आहेत. तर कांही जणांना परदेशातील सुट्टीचा पूर्ण खर्च दिला आहे. कांही कंपन्यांनी आपल्या विशेष कर्मचार्‍यांना फ्लॅट, दागदागिने यांची भेट दिली आहे. ग्लोबल हंटचे अध्यक्ष सुनील गोयल या संदर्भात बोलताना म्हणाले की नजीकच्या काळात बाजारात कंपन्यांना प्रचंड मोठी संधी आहे. परिणामी कंपन्यांनी तज्ञ आणि उत्तम काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यास प्राधान्य दिले आहे. चांगले काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठीही कंपन्या प्रयत्नशील असून त्यातूनच या महागड्या भेटी दिल्या जात आहेत.

याची सुरवात करण्याचे श्रेय जाते गुजराथेतील कृष्णा एक्स्पोर्ट या हिरे निर्यात कंपनीकडे. गेल्या दिवाळीत त्यांनी त्यांच्या १२०० कर्मचार्‍यांना ५० कोटी रूपयांच्या बक्षीसांची भेट दिली होती. त्यात लॉयल्टी सिद्ध केलेल्या कर्मचार्‍यांना किमान ४ लाख रूपये, फ्लॅटच्या किमतीतील कांही रक्कम, हिरे सोन्याचे दागिने, फियाट कार यातून जे हवे ते निवडण्याची मुभाही दिली होती. तोच ट्रेंड आता बड्या कंपन्यांनी स्वीकारला आहे.

Leave a Comment