दुष्काळ-पूरस्थितीची निगराणी करणार नासाचा उपग्रह

nasa
वॉशिंग्टन – याच महिन्यात ‘नासा’ आपला नवा उपग्रह प्रक्षेपित करणार असल्यामुळे दुष्काळ आणि पूरस्थितीवर निगराणी ठेवता येणार आहे. मातीची आर्द्रता सक्रिय आहे अथवा नाही हे तपासणारी यंत्रणा ‘सॉईल मॉईश्‍चर ऍक्टिव्ह पॅसिव्ह’ या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांदरम्यान विविध टप्प्यांमध्ये जमिनीच्या आर्द्रतेचा अंदाज घेणारे नकाशे जारी करण्यात येणार आहेत.

या उपग्रहामुळे संशोधकांना प्रथमच दुष्काळाचा निश्‍चित आराखडा समजून घेता येणार आहे. त्यामुळे, दुष्काळाला कोणत्या भागातून आणि कशी सुरुवात झाली हे समजू शकणार आहे. मातीची आर्द्रता समजल्यामुळे शेतकर्‍यांना चांगल्या पिकांसाठी पावसावर अवलंबून राहावे की सिंचनावर हे निर्धारित करता येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून या उपग्रहाची आखणी सुरू असून त्यासाठी ९१६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, यात वापरण्यात आलेल्या उपकरणांचा कार्यकाळ प्रदीर्घ राहणार असल्याचे संबंधित शास्त्रज्ञांचे मत आहे. येत्या २९ जानेवारीला कॅलिफोर्नियातील व्हॅन्डेनबर्ग तळावरून डेल्टा दोन या प्रक्षेपकातून हा उपग्रह अंतराळात झेपावणार आहे.

Leave a Comment