धबधब्यांचे गांव लॉटरब्रुनेन

falls
स्वित्झर्लंडला निसर्गाने हजारो हाताने सौंदर्य बहाल केले आहे. आल्प्सच्या पर्वतरांगांची सोबत असलेल्या या देशात कोणते ठिकाण अधिक सुंदर हे ठरविण्यासाठी स्पर्धाच घ्यावी लागेल. मात्र त्यातही कांही कोंदणातले हिरे आहेतच. १७७९ साली जर्मन लेखक जोहानन वाल्फगांग गोथा याने शोधून काढलेले लॉटेरब्रुनेन हे छोटेसे गांव असाच एक हिरा म्हणता येईल.

आल्प्स पर्वतराजीत विराजमान असलेल्या उंच कड्यावरील जुंगफ्राऊ या जगातील सर्वाधिक उंचीवरील पर्यटनस्थळी जाण्यासाठी याच गावातून जावे लागते. जुंगफ्राऊला जाणारा रेल्वेमार्ग हा जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्ग आहेच पण बर्फाखालून काढलेल्या महाप्रचंड बोगद्यातून त्यासाठी प्रवास करावा लागतो. लॉटेरब्रुनेन हे गांव मात्र प्रसिद्ध आहे तेथील धबधब्यांसाठी आणि आल्प्सची हिरवीगार कुरणे, खोल दर्‍या, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि लहान मोठ्या सरोवरांसाठी.

या छोट्याशा गावात तब्बल ७२ धबधबे आहेत आणि या धबधब्यांची सततची गर्जना पर्यटकांना एकटेपणा वाटू देत नाही. धबधबे हीच या गावाची ओळख. लॉटरब्रुनेनचा अर्थच मुळी खूप झरे किंवा धबधबे असा आहे. ३०० मीटर उंचीच्या पहाडावरून कोसळणारा स्टॉचबॉच फॉल सर्वाधिक मोठा धबधबा असून येथून बेस जंपिगही करता येते. त्यासाठी केबल कारमधून कांही मिनिटांत पर्वतशिखरावर पोहोचविले जाते. येथे क्रॉस कंट्री सुविधाही मोफत उपलब्ध करून दिलेली आहे मात्र त्यासाठी लॉटेनब्रुनेनचे गेस्ट कार्ड दाखवावे लागते. स्कीईंग आणि तत्सम साहसी खेळांसाठीही हे गांव लोकप्रिय आहे.

Leave a Comment