हानिकारक जिवाणूंवर नियंत्रण मिळविणा-या प्रतिजैविकांचा शोध

nature
लंडन : मानवी शरीरातील हानिकारक जिवाणूंवर तब्बल ३० वर्षांपर्यंत नियंत्रण मिळविणारे प्रतिजैविके तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले असून याबाबतची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकाच्या हल्लीच प्रकाशित झालेल्या अंकात देण्यात आली आहे.

१९५०, १९६० तसेच १९८७ मध्ये यापूर्वी प्रतिजैविकांबाबत संशोधन करण्यात आले होते. त्यावेळी संशोधकांनी निरनिराळे शोध लावले होते. मात्र त्यानंतर बराच काळ शास्त्रज्ञांना याबाबत काही नवीन हाती न लागल्यामुळे या शोधाला महत्त्व प्राप्त झाले आहे. एखाद्या आजारावरील उपचारासाठी प्रत्येकवेळी देण्यात येणा-या प्रतिजैविकांबाबतची माहिती अल्पावधीतच शरीरातील जिवाणूंना मिळते. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्यामध्ये अशा प्रतिजैविकांना विरोध करण्याची क्षमताही निर्माण होते. मात्र, या नव्या संशोधनाद्वारे हानिकारक जिवाणूंचा दीर्घकाळ विरोध करणा-या प्रतिजैविके निर्माण करण्यात आले आहेत. यापूर्वी शोधण्यात आलेली कोणतीही प्रतिजैविके एवढ्या प्रदीर्घ काळ विरोध करू शकत नव्हती. अगदी तब्बल ३० वर्षांपर्यंत ही प्रतिजैविके कार्यरत राहू शकतील, असा दावा या संशोधनात करण्यात आलेला आहे. टिक्सोबॅक्टिन नावाच्या या प्रतिजैविकांचा दोन वर्षानंतर प्रत्यक्ष मानवी शरीरावर प्रयोग करण्यात येणार आहे. त्यानंतर किमान दोन वर्षांनी ही प्रतिजैविके सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत. या संशोधनामुळे मानवी आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment