नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत यशस्वी ठरलेल्या जपानमधील कार उत्पादक कंपनी टोयोटाने इनोव्हा या गाडीची नवी आवृत्ती बाजारात दाखल गेली. इनोव्हाच्या या नव्या आवृत्तीची नवी दिल्ली येथील किंमत (कर वगळता) १०.५१ लाख ते १५.८० लाख रुपयांदरम्यान असणार आहे. याचबरोबर कंपनीने प्रीमियम एसयूव्ही असलेल्या फॉर्च्युनर गाडीची नवी आवृत्ती देखील भारतीय बाजारात दाखल केली आहे.
टोयोटाच्या इनोव्हा आणि फॉर्च्युनरची नवी आवृत्ती बाजारात
फॉर्च्युनरच्या या नव्या आवृत्तीत फोर व्हील ड्राइव्हची सुविधा देण्यात आली असून या गाडीची किंमत (कर वगळता) २४.१७ लाख रुपयांपासून सुरु होत आहे. दरम्यान, इनोव्हाने भारतीय बाजारपेठेतील १० वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने ही नवी आवृत्ती भारतीय ग्राहकांच्या भेटीला आणली आहे.
यासंदर्भात माहिती देताना टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे संचालक आणि वरिष्ठ उपाध्यक्ष एन.राजा यांनी सांगितले की, इनोव्हा आणि फॉर्च्युनर या दोन्ही गाडय़ांना भारतीय बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि या दोन्ही गाडय़ा अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत.
नव्या इनोव्हामध्ये वुड फिनिशिंग स्टियरिंग व्हील, ओक इंटिरियर्स आणि लेदरची आसन व्यवस्था बसविण्यात आली आहे. तसेच डय़ुअल टोनचे अलॉय व्हील देखील आहे. या गाडीच्या इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर फॉर्च्युनरमध्ये आता टचस्क्रीन डिस्पले बसविण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने आता सर्व वाहनांमध्ये एसआरएस एअरबॅग्स बसविल्या असल्याचे देखील यावेळी राजा यांनी सांगितले.