नवी दिल्ली : आतापर्यंत पदवीचे शिक्षण चालू असताना विद्यापीठ बदलण्याची नसलेली सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असून त्यासाठी सर्व राज्य विद्यापीठांत चॉइस बेस्ड क्रेडिट ट्रान्सफर सिस्टीम (निवडीवर आधारलेली श्रेयांक पद्धत) स्वीकारण्यास जवळपास सर्व राज्यांनी मान्यता दिल्यामुळे आवडीचा विषय घेता येण्याची आणि प्रसंगी विद्यापीठ बदलण्याची प्रक्रिया सहज होऊन उच्च शिक्षणात पोर्टेबिलिटी येणार असल्याचे बोलले जात आहे. ही पद्धत आधीच तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये परस्परांत अस्तित्वात आहे.
आता शिक्षणातही चॉइस बेस्ड क्रेडिट ट्रान्सफर सिस्टीम
देशातील सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची परिषद नवी दिल्लीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी क्रेडिट सिस्टीमबाबत चर्चा झाली आणि पुढील शैक्षणिक सत्रापासून यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे आवाहन इराणी यांनी केले. या पद्धतीच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा संयुक्त कृतिगट स्थापन होईल. त्यासाठीचा आराखडा ही समिती तयार करेल. या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा कोर्स निवडता येईल. देशाचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्र सरकार पुढील फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.