मंगळयान १५ दिवस राहणार नॉट रिचेबल

mars
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या संशोधकांसाठी जून महिन्यातील ८ ते २२ जून हा पंधरवडा तणाव पूर्ण राहणार असून बदलत्या ग्रहस्थितीमुळे या कालावधीत भारतीय मंगळयानासोबतचा संपर्क पूर्णपणे खंडित होणार आहे.

सध्या मुंबई येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेसमधील व्याख्यानात इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन यांनी ही माहिती दिली. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळाच्या दिशेने झेपावलेल्या यानासोबतचा संपर्क तुटणार आहे. या कालावधीत होणा-या ग्रहणामुळे संपर्क खंडित होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ प्रमोद काळे यांच्यासोबतच्या प्रश्नोत्तर सत्रात ते बोलत होते.

८ ते २२ जून या काळात सूर्य पृथ्वी आणि मंगळ यांच्या मधे येणार आहे. त्यामुळे मंगळ दिसू शकणार नाही आणि त्या ग्रहावरील यंत्रणेशी असलेला संपर्क खंडित होईल. या दरम्यानच्या कालावधीतील घटनाक्रमाची माहिती नंतर मिळविता येणेही शक्य नसून, यादरम्यान यान पूर्णपणे स्वयंचलित राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंगळयानाच्या उड्डाणापूर्वी अशा ब्लॅकआऊट स्थितीतील त्याच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात आली असून, ती यशस्वी झाली होती. मात्र, यामुळे मंगळ मोहिमेला कोणताही धोका नाही व घाबरण्याचे कारण नाही, असे या योजनेचे संचालक सुबय्या अरुणन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, २०१६ मध्ये पुन्हा साधारण अशीच स्थिती निर्माण होईल. मात्र, त्यावेळी पृथ्वी सूर्य आणि मंगळाच्या मधे येणार असल्याने व्हाईटआऊटची स्थिती निर्माण होईल. याही स्थितीत संपर्क खंडित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment