जमशेदजी टाटांच्या शिक्क्याचे नाणे

tata
देशात उद्योगाचे जनक म्हणून ओळख असलेल्या जमशेदजी टाटा यांच्या १७५ व्या जयंतीनिमित्त त्यांचा शिक्का असलेले नाणे भारत सरकार प्रसारित करत आहे. ७ जानेवारीलाच त्यांची १७५ वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने ६ जानेवारीला पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका छोटेखानी समारंभात या नाण्याचे अनावरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे एखाद्या उद्योगपतीच्या नावाने असे नाणे बनविण्याची भारतातील ही पहिलीच वेळ आहे.

मोदी सरकारने हे नाणे तयार करण्याचा निर्णय घेतला यामागे मोदींच्या मेक इन इंडिया मोहिमेला प्रोत्साहन मिळावे आणि उद्योजकांत सरकारबाबत सकारात्मक संदेश जावा हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार ही नाणी तयार केली असून ती कोलकाता टांकसाळीत पाडली गेली आहेत.१०० रूपये आणि ५ रूपये किमतीची ही चांदीची नाणी संग्राहकांसाठी पर्वणी ठरणार आहे. सध्या मोजकीच नाणी तयार करण्यात आली असून त्याची किंमत आहे ४५०० रूपये.यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यलढा, विशेष प्रसंग, वैज्ञानिक, मंदिरे आणि संस्थांच्या शिक्कयांची विशेष नाणी प्रसारित केली गेली आहेत.

जमशेदजींनी आशियातील पहिली पोलाद कंपनी भारतात सुरू केली आणि उद्योगाचा पाया रचला.त्यांच्याच नावाने जमशेदपूर शहर वसविले गेले. यापूर्वीही त्यांच्यावर १९५८ साली पोलाद उद्योगाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने पोस्टाचे तिकीट जारी केले गेले आहे.

Leave a Comment