प्राचीन भारतीय विज्ञानाची दखल घेतली जावी – जावडेकर

javdekar
मुंबई : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कुठलेही पुरेसे साधन, यंत्र नसताना केवळ सूक्ष्म निरिक्षण, वैचारीकता, अनुभव, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र यांच्या आधारावर प्राचीन भारतीय विज्ञानाने जे साध्य केले त्या ज्ञानाची दखल घेऊन त्याच्या संदर्भांचा उपयोग केला गेला पाहिजे, असे मत मुंबईत आयोजित १०२ व्या भारतीय विज्ञान परिषदेतील ‘संस्कृतच्या माध्यमातून प्राचीन भारतीय विज्ञान’ या चर्चासत्रात व्यक्त केले.

जर्मनीसारखा देश जर आपली संस्कृत भाषा आणि प्राचीन भारतीय विज्ञानाच्या आधारावर नवी उपकरणे, नवे विज्ञान विकसित करीत असेल तर आपण का करु नये असा सवाल जावडेकर यांनी यावेळी केला. प्रत्येक जुनी गोष्ट जशी सोने नसते तशीच प्रत्येक जुनी गोष्ट टाकाऊ सुध्दा नसते असे त्यांनी नमूद केले. आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेमुळे भारतात नवनिर्मितीची कमतरता असून या संदर्भांतील संस्कृती रुजविणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

देशातील युवा वर्गात क्षमता आहे, उत्साह आहे, काहीतरी करुन दाखविण्याची धमक आहे याच आधारावर विज्ञानाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. कार्यालयात किती वेळ काम केले यावरुन वैज्ञानिक छोटा किंवा मोठा नसतो तर त्याच्यातील उपजत बुध्दीमत्तेच्या जोरावर तो मोठा होत असतो आणि तेव्हाच विज्ञानाचा विकास होतो असे ते म्हणाले. निसर्ग नियमाबद्दल सांगताना जावडेकर म्हणाले की, ज्ञान ही प्रगतीशील प्रक्रिया असून सर्व मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित असून त्या विचारात घेणे आवश्यक आहे, नंतर यातील चांगल्या गोष्टी कायम राहतील तर चुकीच्या गोष्टी नष्ट होतील. या चर्चासत्राला भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. निमसे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर, संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उमा वैद्य, मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख गौरी माहुलीकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment