जम्मूकाश्मीरमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री

mufti
श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री बनणार हे आता निश्चित झाले असून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पीडीपीनेही त्याला मान्यता दिली असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातली औपचारीक घोषणा होणेच बाकी असून शुक्रवारी भाजप आणि पीडीपी यांच्यात झालेल्या बैठकीत अंतिम मसुदा तयार करण्यात आला असल्याचे समजते. यानुसार भाजपचा मुख्यमंत्री राज्यात येईल तर पीडीपीचे प्रमुख नेते मुफ्ती मोहम्मद सईद हे सल्लागार म्हणून काम करतील. ते कॉर्डीनेशन समितीचे प्रमुखही असतील. भाजपने राज्याच्या सध्याच्या संविधानिक स्थितीनुसारच काम करण्याची पीडीपीने घातलेली अट भाजपने मान्य केली आहे.

दोन्ही पक्षात झालेल्या बोलण्यांनुसार राज्यातील कोणताही निर्णय कॅबिनेटमध्ये येण्यापूर्वी त्यावर मुख्यमंत्री आणि कॉर्डीनेशन कमिटीची बैठक घेतली जाईल आणि त्यात ज्या मुद्द्यावर सहमती होईल तेच मुद्दे कॅबिनेटमध्ये मांडले जातील. मुख्यमंत्री आणि सईद यांच्यातही दर महिन्याला बैठक होणार आहे. त्यात सरकारच्या कामाची समीक्षा केली जाईल असेही समजते. मात्र दोन्ही पक्षानी मुख्यमंत्रीपद तीन तीन वर्षासाठी वाटून घ्यायचे का एकाच पक्षाचा मुख्यमंत्री पूर्णकाळ राहणार याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

भाजपतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील मुद्द्याचा निर्णयही येत्या आठवड्यात घेतला जाणार असून त्याचवेळी सरकारच्या शपथविधीची तारीखही जाहीर केली जाणार आहे.