ओबामा पांघरणार मैसूरची पारंपारिक सिल्क शाल

obama
मैसूर – यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना भारताची विशेष भेट म्हणून म्हैसूरची प्रसिद्ध आणि पारंपारिक रेशमी शाल पांघरली जाणार असल्याचे वृत्त आहे. कर्नाटक सिल्क इंडस्ट्री कार्पोरेशनचे अध्यक्ष बसवराज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीला दरवर्षी राष्ट्रपती भवनाकडून खास सिल्क शालींसाठी ऑर्डर दिली जाते असे सांगून बसवराज म्हणाले की यंदाही आम्हाला ५० शालींची ऑर्डर आली आहे. राष्ट्रपती भवनात येणार्‍या परेदशी प्रमुख पाहुण्यांना ही शाल आवर्जून दिली जाते. यंदा पंतप्रधान मोदींनी ओबामांना प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. ओबामा राष्ट्रपती भवनाला भेट देतील तेव्हा त्यांना ही शाल दिली जाईल.

एअर इंडियाकडूनही १० हजार म्हैसूर सिल्क साड्यांची ऑर्डर बोर्डाकडे आली आहे अशी माहितीही बसवराज यांनी दिली. या साड्यांची किमत ६ कोटी ५० लाख इतकी आहे. नफ्यातील १ कोटी कर्नाटक सरकारकडे जमा केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१३-१४ सालात कार्पोरेशनने २१ कोटी नफा मिळविला आहे.