विवाहात अडचण केल्याबद्दल ओबामांनी मागितली माफी

golf
सध्या सुट्टी साजरी करत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नकळत एका विवाह सभारंभात अडचण निर्माण केल्याबद्दल संबंधित जोडप्याची माफी मागितली. एका लष्करी जोडीच्या विवाहाचे स्थळ ओबामांना गोल्फ खेळायचे असल्यामुळे अचानक बदलावे लागले त्यासंबंधी ही माफी होती.

मिळालेल्या माहितीनुसार नॅटली हेमल आणि एडवर्ड मोल्ये यांचा विवाह काइलुओ गोल्फ कोर्सजवळील समुद्रकिनार्‍यावर एका ठिकाणी होता. हे दोघेही लष्करात कॅप्टन आहेत. विवाहाची रंगीत तालिमही झाली होती. मात्र सुट्टीवर आलेले ओबामा यांनी राहण्यासाठी भाड्याने घेतलेले घर याच परिसरात आहे व नेमक्या विवाहादिवशीच ओबामांना आपल्या मित्रांसोबत गोल्फ खेळण्याची इच्छा झाली. परिणामी लग्न समारंभ आयोजित केलेल्या कॉन्टॅक्टरला सुरक्षा व्यवस्थेकडून विवाह अन्य ठिकाणी हलविण्याची सूचना आली. त्यानुसार विवाह जवळच दुसर्‍या ठिकाणी साजरा झालाही.

लग्नाचे ठिकाण बदलावे लागले तरी नाराज न होता वधूवरांनी समारंभाचा आनंद लुटला त्यामागे दोन कारणे होती. एकतर आलेल्या पाहुण्यांना ओझरेते का होईना पण ओबामांचे दर्शन घडले. आणि दुसरे ओबामांनी वर एडवर्डचा फोननंबर कॉन्टॅक्टरकडून घेऊन त्याला फोन केला आणि झालेल्या गैरसोयीबद्दल चक्क माफी मागितली.