बाळासाहेबांच्या अखंड ज्योतीला बंदी

balasaheb
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर कोणतेही बांधकाम करू नये अशी अट घातल्यानंतर स्मृतीस्थळाला परवानगी देण्यात आली होती. पण आता मुंबई हेरिटेज आणि संवर्धन समितीने स्मृतीस्थळापुढे अखंड ज्योत लावताना या अटीचा भंग होत असेल तर त्यास हरकत घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या उद्यानरूपी स्मृतीस्थळासमोर `अखंड ज्योत’ लावण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसा प्रस्ताव महापालिकेने हेरिटेज समितीकडे पाठविला आहे. समितीचे अध्यक्ष व्ही. रंगनाथन यांनी हा प्रस्ताव आल्याचे मान्य केले. मात्र, हा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अखंड ज्योत नेमकी कशी असेल? त्यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर होणार आहे, ज्योतीभोवती उभारण्यात येणारे कुंपण वा बांधकाम कोणत्या आकाराचे असेल, याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण प्रस्तावात नसल्याचे रंगनाथन यांनी सांगितले. हेरिटेज समितीच्या एका सदस्याने अधिकच कठोर भूमिका मांडली. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला काही अटींवर परवानगी देण्यात आली होती. बांधकामरहित स्मृतीस्थळ ही त्यातील प्रमुख अट होती. अखंड ज्योत उभारताना त्या अटीचा भंग झाल्यास हा प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही. अनेक प्रकरणात आम्ही अशी परवानगी नाकारली आहे, हेही या सदस्याने निदर्शनास आणले.

Leave a Comment