पुण्यात बंगळूर स्फोटाचा तपास

banglore1
पुणे : महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथक बंगळूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क झाले असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष खबरदारी घेण्याचे आदेश सर्व एटीएस विभागांना देण्यात आले आहेत. पुणे एटीएसचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी, देशविघातक कृत्ये रोखण्यासाठी नागरिक आणि धार्मिक संस्थांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नव्या वर्षाच्या स्वागताला रात्री उशिरापर्यंत लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. या संधीचा फायदा घेऊन दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जंगली महाराज रस्ता, एम. जी. रस्ता, चांदणी चौक या भागातील कचराकुंड्या ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी दर एक तासाला साफ करण्यात याव्या तसेच या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवावा, असे पत्र एटीएसने पुणे मनपाला दिले आहे तसेच नागरिकांनी या भागात चारचाकी व दुचाकी वाहने पार्क करू नये व गर्दीही करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील मोठ्या व नामांकित हॉटेलचालकांना २९ डिसेंबरपासून दाखल होणा-या ग्राहकांची आणि परदेशी नागरिकांची विशेष तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे तसेच प्रमुख संशयित ठिकाणांचे सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर व्यवस्थित सुरू आहेत का? याचीही तपासणी करण्यास सांगितले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

Leave a Comment