या गावातील नागरिक घेताहेत कुंभकर्णाची झोप

kalachi
गेली चार वर्षे उत्तर कझाकिस्तानातील कालाची गांव वैज्ञानिकांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. चार वर्षे सतत संशोधन करूनही या गावातील लोकांच्या झोपेमागे काय कारण असावे याचा तपास वैज्ञानिक लावू शकलेले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार गेली चार वर्षे या गावातील नागरिकांना असाध्य झोपेच्या आजाराने ग्रासले आहे. येथे लोकांना अचानकच न आवरता येणारी झोप येते आणि ते कांही तास ते कांही महिने या झोपेतून जागेच होत नाहीत. या आजाराचे स्लीप हॉलो असे नामकरण करण्यात आले आहे. एप्रिल २०१० पासून हा कुंभकर्णी झोपेचा आजार या गावात आला आहे. येथील वस्ती आहे केवळ ६०० नागरिकांची. मात्र सध्या या आजाराने येथे १४ टक्के नागरिक ग्रस्त आहेत. सप्टेंबर महिन्यात शाळेत प्रार्थना सुरू असताना असेच अचानक ८ विद्यार्थी झोपले ते अद्यापी झोपेतून जागे झालेले नाहीत.

या झोपी गेलेल्या नागरिकांच्या अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यात असे आढळले आहे की या नागरिकांच्या मेंदूत एका विशिष्ठ द्रवाची पातळी वाढली आहे. मात्र ही पातळी वाढण्याचे कारण अद्यापी उलगडलेले नाही. कांही वैज्ञानिकांच्या मते पाणी प्रदूषणामुळे असे होत असावे तर कांही जणांच्या मते हे गांव सध्या बंद असलेल्या युरेनियमच्या खाणीजवळ असल्याने त्या रेडिएशनच्या परिणाम असावा. मात्र त्यासाठीही कांही भक्कम पुरावा अद्यापी तरी वैज्ञानिकांच्या हाती लागलेला नाही.