रविवार अचानक बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानाला जलसमाधी मिळाल्याचे स्पष्ट होत असतानाच याच कंपनीचे दुसरे विमान फिलिपिन्सजवळ अपघातातून थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे. १५९ प्रवासी असलेले हे विमान मनीलाजवळ उतरत असताना रनवेवरून घसरले आणि चिखलात रूतल्याचे समजते. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.
एअर एशियाचे विमान अपघातातून थोडक्यात बचावले
ऑपरेशन इनचार्ज जियोवानी होंतोमिन यांनी दिलेल्या माहितीनुसार एअर एशियाचे एअरबस ३२०-२०० हे विमान अकलान प्रांतातील कालिबो शहराजवळ अपघातग्रस्त झाले. विमान उतरत असताना ते रनवेवरून घसरले आणि कांही काळ सरपटत जाऊन अखेर चिखलात रूतले. विमानात अडकलेल्या सर्व प्रवाशांना इमर्जन्सी स्लायडरच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कांही काळ विमानतळ बंद ठेवला गेला.
रविवारी बेपत्ता झालेले विमान समुद्रात कोसळल्याचे आता स्पष्ट झाले असून त्यातील ४६ प्रवाशाचे मृतदेह समुद्रावर तरंगताना सापडले आहेत. त्यात एका क्रू सदस्याचाही समावेश आहे. विमानाचे अवशेषही समुद्रावर तरंगताना आढळले आहेत.