स्टीफन कॉन्स्टॅन्टाइन पुन्हा भारतीय फुटबॉल प्रशिक्षकपदी

stephen
नवी दिल्ली : सायप्रसच्या स्टीफन कॉन्स्टॅन्टाइन यांची दुस-यांदा भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली गेली आहे. या निर्णयावर अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या तांत्रिक समितीने शिक्कामोर्तब केले. या नियुक्तीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होईल व स्टीफन पुढील महिन्यात रुजू होतील, असे संकेत आहेत. ‘कॉन्स्टॅन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील, हे जवळपास निश्चित आहे. तांत्रिक समितीने त्यांच्या नावाला हिरवा कंदील दर्शविला असून लवकरच अधिकृत घोषणा होईल’, अशी माहिती सुत्राकडून मिळाली आहे.

५२ वर्षीय कॉन्स्टॅन्टाइन यापूर्वी २००२ ते २००५ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिले होते. त्यानंतर आता विम कोव्हरमन्स यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारतील. अर्थात, कॉन्स्टॅन्टाइन यांचे मानधन मात्र कोव्हरमन्स यांच्यापेक्षा कमी असणार आहे. दोन वर्षांचा करार पूर्ण करून पायउतार झालेल्या माजी प्रशिक्षक डचमन कोव्हरमन्स यांना यापूर्वी प्रत्येक महिन्याला २० हजार डॉलर्सचे मानधन अदा केले जात होते.

Leave a Comment