लाचलुचपत खात्याचे ही येणार मोबाईल ऍप

anti-corruption
मुंबई – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आता मोबाईल ऍपद्वारे लाचखोर लोकसेवकांची माहिती आणि छायाचित्रे आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणाऱ्या लोकांशी अधिक जवळीक साधण्यात येणार आहे. सरकारी नोकर व लोकसेवकांच्या लाचखाऊ वृत्तीला बळी पडलेल्या तक्रारदारांना एका क्लिकद्वारे या मोबाईल ऍपवरून व्हिडिओ, ऑडिओ आणि डिजिटल फाईल्स लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवता येणार आहेत. हे ऍप तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर सरकारी अधिकारी, कर्मचारी, त्यांचे दलाल आणि लोकसेवकांची छायाचित्रे व माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. ही पद्धत सुरू करणारा हा देशातील पहिलाच विभाग आहे. या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ हजार ६६१ लाचखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लाचखोरांच्या विरोधात यशस्वी सापळे रचल्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोबाईल ऍप तयार करायला सुरुवात केली आहे. हे ऍप तयार झाल्यावर त्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सध्याचा १०६४ हा टोल फ्री क्रमांक, विभागाच्या फेसबुक खात्याची लिंक, प्रमुख अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे मोबाईल व दूरध्वनी क्रमांक अशी माहिती असणार आहे. त्यामुळे तक्रारदार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्यांना या ऍपचा चांगलाच फायदा होणार असून आपली तक्रार तत्काळ नोंदवता येणार आहे. त्यामुळे लाचखोरांना पकडण्यासाठी अचूक सापळे रचण्यातही मदत होणार आहे.

Leave a Comment